लातूर – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील 42310 कुटुंबांना रेशीम साडी मोफत देण्यात आली आहे. अंत्योदय शिधापत्रिका धारक असलेल्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. मात्र या निमित्ताने पंतप्रधान , मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि संबंधित खात्याचे मंत्री यांचे फोटो या कुटुंबांच्या घरात पोहोचवण्यात आलेले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने कॅप्टिव्ह मार्केट योजने अंतर्गत राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला एक रेशीम साडी दरवर्षी मोफत देण्याची योजना सुरू करण्यात आली. सलग पाच वर्षे ही योजना राबवली जाणार आहे. २०२३ ते २०२८ पर्यंत ही योजना राबविण्याचे नियोजन केले आहे. यामुळे पावरलूम धारकांच्या हाताला काम मिळाले आहे. राज्यातील २४ लाख ८० हजार ६६ कुटूंबांना याचा लाभ देण्यात आला आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि संबंधित खात्याचे मंत्री यांची छायाचित्रे असणारे स्टिकर साडीवर लावण्यात आलेले होते.
लातूर जिल्ह्यात ४२३१० लाभार्थी
या योजनेचे लातूर जिल्ह्यात 42 हजार 310 लाभार्थी आहेत. यामध्ये लातूर तालुका 9526 लाभार्थी , उदगीर तालुका ४४९७ लाभार्थी , निलंगा तालुका ६५६७ लाभार्थी , औसा तालुका 6255 लाभार्थी , चाकूर तालुका 3072 लाभार्थी, रेणापूर तालुका 2363 लाभार्थी, देवणी तालुका १९३७ शिरोळ पिंपळ तालुका 2018 जळकोट तालुका 1847 लाभार्थी , अहमदपूर तालुका 4218 लाभार्थी आहेत.
खरे तर शासनाच्या वतीने योजना राबवत असताना भेदभाव करणे योग्य आहे ही योजना राबवताना केवळ अंत्योदय शिधापत्रिकाधारक यांनाच याचा लाभ देण्यात आला. राज्यातील सर्वच शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ देण्यात आला पाहिजे होता मात्र तसे न झाल्याने काही प्रमाणात नाराजीचा सुर उमटत आहे.