लातूर – लातूर शहराची दैदिप्यमान परंपरा व भारतीय संस्कृतीचे प्रतिक असलेल्या यंदाच्या सुवर्ण महोत्सवी सामुदायिक दसरा महोत्सवाचे ऐतिहासिक ध्वजारोहण २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी दिली.
लातूरचे लोकप्रिय खा. सुधाकरजी शृंगारे, सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक संजीवकुमार, आर्य समाजचे प्रधान ओमप्रकाशजी पाराशर, सीए प्रकाश कासट, बाजार समितीचे माजी सभापती ललितभाई शहा, उद्योजक हुकुमचंद कलंत्री, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. बळवंत जाधव, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक धर्मवीर भारती आणि दिलीप माने, राजकुमार पल्लोड, रामदास भोसले या विशेष अतिथींच्या उपस्थितीत होत असलेल्या या ध्वजारोहण सोहळ्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. कराड यांनी केले.
दरम्यान, महोत्सव समितीचे शहराध्यक्ष ईश्वर बाहेती, ग्रामीण अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, कार्याध्यक्ष जयप्रकाश दगडे, उपाध्यक्ष पतंजली फेम योगगुरु विष्णुभाऊ भुतडा प्रभृतींनी शनिवारी ना. बनसोडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन दिलेल्या निमंत्रणाचा मंत्री महोदयांनी स्वीकार केला असल्याचेही आ. कराड यांनी सांगितले.