महाराष्ट्रातील मुख्य घटक असलेल्या मराठा समाजाने राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. या समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असून 99 टक्के मराठा समाज अल्पभूधारक आहे. परिणामी समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली असून समाजातील अनेक मुले शैक्षणिक व नौकरीच्या सुविधांपासून वंचीत आहेत. मराठा समाजाची हि परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ या समाजास आरक्षण द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
मराठा समाज सद्या अनेक अडचणींना सामोरे जात असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. तसेच 99 टक्के मराठा समाज अल्पभूधारक आहे. या समाजातील सुशिक्षीत बेरोजगारांची संख्याही प्रचंड मोठया प्रमाणात असुन दिवससेंदिवस या मध्ये भर पडत आहे, परिणामी मराठा समाजाला आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे आरक्षण नसल्यामुळे गरीब मराठा समाज कुटूंबातील अनेक मुलांना शैक्षणिक व नौकरीच्या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. याचा परिणाम म्हणुन मागील काही काळात मराठा कुटूंबातील आत्महत्याच्यां प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. मराठा समाजाची आजची ही परिस्थिती लक्षात घेता या समाजाला आरक्षण देणे अत्यंत महत्वाचे असल्याचे माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लिहलेल्या पत्रात अधोरेखीत केलेले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरंगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केलेले असुन मराठा क्रांती मोर्चाने याबाबत विविध मागण्या केलेल्या आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने मनोज जरंगे पाटील यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणास व मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व मागण्यांना पाठींबा दर्शवत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे